चिकोडी येथे एका पान दुकानदाराने रस्त्यावर सापडलेले पैशांचे आणि कागदपत्रांचे पाकीट मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचे उदाहरण ठेवले आहे.

चिकोडी शहरातील राघवेंद्र हॉटेलजवळ राजीव शेट्टी यांचे पान दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर एका व्यक्तीचे पाकीट पडले होते. राजीव शेट्टी यांनी ते पाकीट उघडून पाहिले असता, त्यात १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि व्हीआरएल (VRL) प्रवासाचे तिकीट असल्याचे दिसून आले.

काही वेळानंतर पाकीट हरवलेली व्यक्ती ते शोधत तिथे आली. राजीव शेट्टी यांनी आवश्यक चौकशी करून खात्री पटवल्यानंतर ते पाकीट रोख रक्कम आणि तिकीटासह त्या व्यक्तीला परत केले. आपले पैसे परत मिळाल्याने संबंधित व्यक्तीने राजीव शेट्टी यांचे आभार मानले.
राजीव शेट्टी यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजसेवक चंद्रकांत हुक्केरी, पत्रकार सुधीर कुंभोजकर आणि अशोक शेट्टी यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या या भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे.


Recent Comments