बेळगावजवळील हिंडालको कंपनीत काम करणाऱ्या एका तरुण कामगाराने कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीवर दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगाव तालुक्यातील मुत्त्यानट्टी येथील रहिवासी असलेल्या शंकर तळवार या २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपले जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सविस्तर चिठ्ठी पोस्ट केली होती. यामध्ये त्याने आपली नोकरी सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदार पायल नंदी याने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. गरीब कुटुंबातील असल्याने एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने आणि नोकरी जाण्याच्या भीतीने त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच मुत्त्यानट्टी येथील शेकडो ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी कंपनीबाहेर गर्दी केली. कंत्राटदार आणि व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी हिंडालको कार्यालयावर दगडफेक केली, ज्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुत्त्यानट्टी गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कंपनी प्रशासनाशी चर्चा करू, असे आमदार आसिफ सेठ यांनी म्हटले.
या भागात कारखाना उभारणीसाठी स्थानिक नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या आणि त्यांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आता नियमांचे उल्लंघन करून बाहेरील राज्यातील लोकांना कामावर घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. मृत कामगाराच्या कुटुंबाला योग्य भरपाई आणि नोकरी मिळावी, अशी मागणी वाल्मिकी समाजाचे नेते महेश शिगीहळ्ळी यांनी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात शंभरहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments