बेळगाव येथील मारुती नगर फेज २ मधील रहिवाशांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागाच्या तातडीच्या विकासासाठी रहिवासी विकास संघाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या ६-७ वर्षांपासून मारुती नगर परिसरात अनेक मध्यमवर्गीय, दिव्यांग आणि कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, महानगरपालिकेकडून येथे कोणत्याही किमान सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात या भागातील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर, मारुती नगर परिसरात २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, सांबरा रस्त्यावरून महामार्गाला जोडणारे दोन सुसज्ज रस्ते तयार करणे, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच भूमिगत सांडपाणी व्यवस्था, गटार बांधणी, रोजचा कचरा उठाव आणि मुख्य चौकांमध्ये हायमास्ट दिव्यांसह पथदिवे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. नियमित कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने न्याय मिळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
यावेळी रहिवासी विकास संघाचे अध्यक्ष अशोक निंगप्पा अण्णिगेरी, उपाध्यक्ष रमेश मगदूम, सदस्य अरुण माने, शिवाजी अडिमनी, बसवराज हंडगी, कमलापूरी, किरण अंगडी आणि प्रकाश शिवयोगी यांच्यासह इतर प्रमुख नागरिक उपस्थित होते, अशी माहिती रहिवासी विकास संघाच्या वतीने देण्यात आली.


Recent Comments