देशाची आर्थिक प्रगती केवळ जीडीपी वाढीवर अवलंबून नसून प्रत्येकाला रोजगाराच्या संधी मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत प्रसिद्ध उद्योजक सचिन सबनिस यांनी व्यक्त केले आहे. बेळगाव येथील फाउंड्री क्लस्टरमध्ये आयोजित ‘विकसित भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते.

बेळगावच्या फाउंड्री क्लस्टरमध्ये ‘विकसित भारत’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर प्रीती कामकर, खासदार जगदीश शेट्टर, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे आणि उद्योजक सचिन सबनिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून बोलताना उद्योजक सचिन सबनिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पांतर्गत सुरू असलेल्या रोजगारभिमुख प्रोत्साहन योजनांच्या महत्त्वाचा गौरव केला. लहान आणि मध्यम उद्योगांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पीएम-व्हीबीआरवाय आणि सामाजिक सुरक्षा योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणे हा होता. सुमारे २०० हून अधिक उद्योजक, युवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कामगार सुधारणांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.


Recent Comments