बेळगाव तालुक्यातील मुतगा ग्रामस्थांनी गेल्या दशकभरापासून रस्ते आणि ड्रेनेजच्या दुरवस्थेचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पुढील १५ दिवसांत या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मुतगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या श्रीराम कॉलनी, साई नगर, गोकुळ नगर आणि विनायक नगरमधील रहिवासी गेल्या दोन दशकांपासून अर्धवट रस्ते, नादुरुस्त ड्रेनेज आणि कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या संदर्भात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) निवेदन सादर केले.

खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यांतून पादचारी, वृद्ध आणि शाळकरी मुलांना प्रवास करावा लागत आहे. त्यातच ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आणि घरांसमोर साचत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियमित कर भरूनही स्थानिक ग्रामपंचायत निधीचे कारण पुढे करत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाने तातडीने विशेष निधी मंजूर करून रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अन्यथा जिल्हा प्रशासनाला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी यांनी दिला.
या वेळी आकाश शेट्टी, शिवू पाटील, विनोद कुलकर्णी यांच्यासह मुतगा गावातील नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments