बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात श्री महाराणी देवी यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.


दर तीन वर्षांनी होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या वेळी सजवलेल्या पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत देवीचा जयघोष करण्यात आला.


या यात्रेनिमित्त गावातील श्री महालक्ष्मी, श्री यल्लम्मा आणि श्री बनशंकरी देवीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजर आणि ढोल-ताशांच्या आवाजात पालखीची गावातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी हातात आरत्या घेऊन या महोत्सवाचा थाट वाढवला.
मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक विधी, विशेष पूजा आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम झाले. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तसेच रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. या सोहळ्याला संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला श्री महाराणी देवी मंदिर कमिटीचे अध्यक्ष शिवाजी हुंक्रिपाटील, सचिव अण्णप्पा पाटील, सदस्य बसणगौडा हुंक्रिपाटील, यमनाप्पा रावळगौडर, रामचंद्र हुंक्रिपाटील, विठ्ठल निंगणगौडर, अप्पण्णा हुंक्रिपाटील, सदाशिव ลखणगौडर, शंकर नगारी आणि नागप्पा नगारी उपस्थित होते.


Recent Comments