बेळगावात अनेक दशकांपासून लाखो मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिका (प्रवीण कुमार शेट्टी गट) संघटनेच्या वतीने बेळगावात विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समिती ही कोणाची जहागीरदारी नसून ती सीमाभागातील लाखो मराठी माणसांची हक्काची संघटना आहे. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी कन्नड संघटनांनी या समितीवर भाषिक सलोखा बिघडवत असल्याचा जाणीवपूर्वक आरोप करत कोल्हेकुई सुरू केली आहे. कर्नाटक सरकारच्या सक्तीच्या कन्नड भाषा धोरणाचा लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने निषेध करणाऱ्या समितीच्या भूमिकेला विरोध करत कन्नड संघटनांकडून कोलांटउड्या मारल्या जात आहेत.

कन्नड वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून प्रशासनाला वेठीला धरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर तात्काळ पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अन्यथा आगामी काळात बेळगावसह संपूर्ण राज्यभरात कायदा व सुव्यवस्था वेठीस धरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी वल्गना कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


Recent Comments