नवी दिल्लीच्या ‘प्रयास’ संस्थेच्या वतीने आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून बेळगावात तीन दिवसीय ‘सेकंड व्हिजन कर्नाटक-२०२६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रयास संस्थेचे प्रमुख वनीश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नेहरू नगर येथील केएलई संस्थेच्या कन्व्हेन्शन सेंटरमधील ‘डॉ. बी. एस. जिरगे ऑडिटोरियम’मध्ये २३ ते २५ जून दरम्यान सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. संरक्षण, कृषी, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान आणि इस्रोसारख्या नामांकित संस्थांच्या तांत्रिक नवकल्पनांची माहिती नागरिकांना येथे मिळणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणून २४ जून रोजी सकाळी ‘फ्यूचर ऑफ बेळगाव@२०४७’ या विषयावर भव्य चर्चासत्र आयोजित केले असून, यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती नागराज पाटील यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला खासदार जगदीश शेट्टर, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि माजी आमदार अनिल बेनके उपस्थित होते.


Recent Comments