माजी उपमुख्यमंत्री आणि अथणीचे विद्यमान आमदार लक्ष्मण सवदी यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी करत गाणिगा समाजाने पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना समाजाच्या प्रमुखांनी सांगितले की, कर्नाटकात गाणिगा समाजाची लोकसंख्या सुमारे ४० ते ५० लाख आहे. परंतु, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने या समाजाला मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व दिलेले नाही. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेते लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद मिळायलाच हवे, अन्यथा समाज राजकीयदृष्ट्या कठोर निर्णय घेईल.

हा समाज अत्यंत मागासलेला असून लक्ष्मण सवदी यांनी सातत्याने लोकहिताची कामे केली आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेणे गरजेचे आहे. संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला गाणिगा समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेनंतर गाणिगा समाजाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राणी चेन्नम्मा सर्कलपासून एक भव्य निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी समाजाच्या नेत्यांनी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली.


Recent Comments