बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण मोहीम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे निर्देश विभागीय आढावा बैठकीत देण्यात आले. जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित विविध सरकारी विभागांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.


या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना सहकार आणि जिल्हा प्रभारी सचिव संजय शेट्टणवर यांनी जिल्ह्यात ३० जून ते ७ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेत एकही पात्र मतदार सुटणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले.

या वेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माहिती दिली की, मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेंतर्गत बेळगाव जिल्ह्याने मॅपिंगच्या कामात ९३ टक्के प्रगती केली आहे. मान्सून लांबल्याने ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
या विभागीय आढावा बैठकप्रसंगी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments