Belagavi

बेळगाव शहरात गुन्हेगारी नियंत्रण पथकाची मोठी कारवाई

Share

कर्नाटक राज्य पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार बेळगाव शहरात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी विशेष गुन्हेगारी नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे असून डीसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागांत अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तहसीलदार गल्ली आणि भांदूर गल्ली येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत गौरांग उर्फ गौरव जगन्नाथ गेंजी याच्या घरातून दोन तीक्ष्ण तलवारी आणि दोन वाघनखे जप्त करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत श्रीधर उर्फ सिद्धू दिलीप गेंजी या संशयिताकडून एक तीक्ष्ण कोयता जप्त करण्यात आला. पीएसआय हुसेनसाब केरूर आणि पीएसआय मणिकंठ पुजारी यांच्या पथकाने या दोन्ही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आर्म्स ॲक्ट आणि कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ येथील विद्यानगर परिसरात पीएसआय विश्वनाथ घंटामठ यांनी श्रवण संतोष शिर्वेकर याला दुचाकीवरून कोयता आणि लोखंडी सायकल चेन घेऊन जाताना पकडले. दुसऱ्या एका कारवाईत, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्तवाड रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या हसनसाब गौसमोद्दीन मुल्ला या आरोपीला पीएसआय अविनाश ए. वाय. यांच्या पथकाने अटक केली.

याच मोहिमेत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय लक्कप्पा एस. जोडट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नंदीहल्ली गावातील जाधव गल्लीत छापा टाकला. तेथे बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणारा ५० वर्षीय देवप्पा बाळप्पा लोकुरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३,४६५ रुपये किमतीची ५.६७० लीटर दारू जप्त करण्यात आली असून त्याच्यावर अबकारी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धाडसी कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: