आपल्या विरोधकांना खोट्या गुन्यात अडकवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचणाऱ्या तिघांना विजापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांची दिशाभूल करून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संशयितांचा डाव विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तपासात उघड झाला आहे.

विजापूर शहरानजीकच्या इट्टंगीहाळ येथील दयानंद डेरी हा या प्रकरणातील संशयित आहे. ३ जून रोजी तोरवी गावाच्या शिवारात आपल्या शेतात काम करत असताना दोन अज्ञात बुरखाधाऱ्यांनी आपल्यावर गोळीबार केला, अशी तक्रार दयानंदने विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले. दयानंद डेरीने आपले साथीदार आनंद मायप्पा डेरी आणि कोंडीबा बीरप्पा मानवर यांच्यासोबत मिळून हा गोळीबाराचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आनंद डेरी याच्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलातून दयानंद डेरी याच्या उजव्या हातावर गोळी झाडण्यात आली होती. या जखमेचा आधार घेऊन अज्ञातांनी हल्ला केल्याची तक्रार देण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
गुन्ह्याचा खोटा देखावा निर्माण करणे, पुरावे नष्ट करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.


Recent Comments