Belagavi

बेळगावात १.५३ लाख अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन तातडीने बंद

Share

सरकारी योजनांचा अपात्र व्यक्तींकडून गैरवापर केला जात असल्याचा मोठा प्रकार बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत तब्बल १ लाख ५३ हजार अपात्र लाभार्थ्यांची पेन्शन तातडीने बंद केली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात एकूण १ लाख ८२ हजार अपात्र पेन्शनधारकांची माहिती समोर आली होती. त्यापैकी प्राथमिक तपासणीत नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्या १.५३ लाख लोकांची पेन्शन सेवा जिल्हा प्रशासनाने खंडित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ६५ वर्षांपेक्षा कमी वय असतानाही वृद्धापकाळ वेतन घेणारे, वार्षिक ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले आणि जिल्हा सोडून इतरत्र स्थलांतरित झालेल्या लोकांचा समावेश आहे.

या संदर्भात माहिती देताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अपात्र पेन्शनधारकांचा शोध घेऊन ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी खोटे दस्तऐवज आणि उत्पन्नाचे दाखले सादर करून शासनाची फसवणूक केली आहे की यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे, याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच शासनाकडून येणाऱ्या पुढील मार्गदर्शक सूचनांनुसार दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केले.

Tags: