बेळगावमधील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी असून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा थकीत दंड भरण्यासाठी सरकारने ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. कर्नाटक सरकारने मे २०२६ पूर्वीच्या सर्व प्रलंबित ई-चलन प्रकरणांसाठी ही विशेष योजना लागू केली आहे.

बेळगावमधील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाहनांवर वाहतूक नियम उल्लंघनाचा थकीत दंड असलेल्या नागरिकांसाठी सरकारने ५० टक्के सवलतीची घोषणा केली आहे. कर्नाटक राज्य सरकारमार्फत मे २०२६ पूर्वी पोलीस विभागाच्या वाहतूक ई-चलन प्रणालीमध्ये नोंद झालेल्या थकीत दंडाच्या रकमेवर ही सूट देण्यात आली आहे. ही विशेष सवलत योजना २१ जून २०२६ पासून सुरू होणार असून १० जुलै २०२६ पर्यंत लागू राहील. बेळगावमधील नागरिक आणि वाहनधारकांनी आपल्या वाहनांवरील जुन्या थकीत दंडाची निम्मी रक्कम भरून प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

नागरिकांना थकीत दंड भरण्यासाठी प्रशासनाने अनेक सोप्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वाहनधारक त्यांच्या जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाच्या स्वागत कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे हा दंड भरू शकतात. याशिवाय बेळगावमधील कर्नाटक वन किंवा बेळगाव वन केंद्रांतर्गत येणाऱ्या अशोक नगर, दूरदर्शन नगर (टीव्ही सेंटर), रिसालदार गल्ली (जुनी कॉर्पोरेशन इमारत) आणि गोवावेस केंद्रांवरही दंड भरण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर ई-चलन मशीनसह कार्यरत असणाऱ्या एएसआय आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडेही दंड जमा करून पावती घेता येईल. नागरिकांनी या २० दिवसांच्या सुवर्णसंधीचा निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


Recent Comments