“कर्नाटकातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जेडीएस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’सारखी खेळी खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.”

बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कुमारस्वामी यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिले. सध्या राज्यातील सत्ता काँग्रेसच्या हातात असून मनुष्यबळ, बाहुबल आणि पैसा या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत, अशा बलाढ्य सत्तेसमोर आम्ही लढू शकत नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जेडीएसने आपल्या पक्षाची मते विखुरली जाऊ नयेत आणि ती एकत्र राहावीत, याच उद्देशाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही चुकीच्या किंवा कुटिल मार्गाचा अवलंब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. आमच्या उमेदवाराने केवळ सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या विवेकबुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, अतिरिक्त मतांच्या पाठिंब्यासाठी भाजप नेत्यांना विनंती करण्यात आली असून, आपली हक्काची मते सुरक्षित ठेवण्यासाठीच हा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments