Belagavi

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

Share

हुबळीमधील बंगेरी येथील हरिजन कॉलनीत राहणाऱ्या एका ३९ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि महिला पोलिसांच्या छळाला कंटाळून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष अळ्ळूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

संतोष आणि ललिता अळ्ळूर यांचा १८ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, त्यांना तीन मुले आहेत. संतोषने आपल्या पत्नीला अंगणवाडीत नोकरी मिळवण्यासाठी मदत केली होती. नोकरी कायम झाल्यानंतर पत्नीच्या वागण्यात बदल झाला आणि त्यांच्यात सातत्याने भांडणे होऊ लागली. या वादातून ललिताने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि घटस्फोटासाठी अर्जही केला होता.

पत्नी सोबत राहत नसल्यामुळे संतोष मानसिक तणावाखाली होता. या दरम्यान त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असून, नातेवाईकांनी पत्नी आणि महिला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी केशवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: