बेळगावमध्ये मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी महिलेला जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी हा निकाल दिला असल्याची माहिती सरकारी वकील नारायण आर. ई. यांनी दिली.

ही घटना ३० एप्रिल २०२३ रोजी रात्री कीर्ती हॉटेलसमोरील ढोर गल्ली क्रॉसजवळ घडली होती. फिर्यादी आणि नागराज भीमशी रागीपाटील हे दोघे दुचाकीवरून जात असताना, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जयश्री पवन पवार या महिलेने त्यांना अडवून मोबाईलची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता, जयश्रीने आपल्याकडील चाकूने नागराजच्या छातीत वार केला. या गंभीर हल्ल्यात नागराजचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक पॉल प्रियकुमार यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे तपासून आरोपी जयश्री पवार हिला दोषी ठरवत ७ वर्षांची कैद आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. तसेच, मृताच्या वारसांना योग्य ती आर्थिक मदत देण्याची शिफारस न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केली आहे.
एकीकडे क्षुल्लक कारणांवरून वाढणारी गुन्हेगारी चिंताजनक ठरत असतानाच, दुसरीकडे न्यायालयांचे गतिमान निकाल कायद्याचा वचक निर्माण करत आहेत. गुन्हेगार कितीही क्रूर असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Recent Comments