सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या समाजाच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. एसटी समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि सरकारमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, आपल्या समाजाचे प्रामुख्याने दोन ते तीन प्रश्न प्रलंबित आहेत. आरक्षणासंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या वादात समाजाची बाजू भक्कमपणे मांडणे किंवा त्यावरील स्थगिती उठवणे गरजेचे आहे. यासाठी ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा केली जाईल. पूर्वीप्रमाणेच आपल्या समाजाला आणखी दोन मंत्रीपदे मिळावीत आणि सध्या विद्यापीठांमध्ये कुलगुरू पदावर एसटी समाजातील व्यक्ती नसल्याची त्रुटी दूर करावी, यांसह विविध मागण्यांवर चर्चा केली जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

याच वेळी विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) सदस्यांना केवळ मतदानाच्या प्रशिक्षणासाठी नेले जात असून इतर कोणताही हेतू नाही. आपल्याकडे मतांची कमतरता नाही आणि निवडणुकीला अजून दोन दिवस बाकी आहेत. तसेच बेळगावमध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली.


Recent Comments