बेळगावमध्ये गुन्हेगारीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सीसीबी आणि मार्केट पोलिसांनी गेल्या २४ तासांत धडक संयुक्त कारवाई केली आहे. या वेगवेगळ्या दोन छाप्यांमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा आणि बेकायदेशीर घातक शस्त्रास्त्रांसह एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.

पहिल्या कारवाईत सीसीबीच्या पथकाने गोकाक-बेळगाव रस्त्यावरील करीकट्टी क्रॉसजवळ छापा टाकून हुक्केरी येथील मृत्यूंजय जडगी (१९) याला अटक केली. त्याच्याकडून १.५० लाख रुपये किमतीचा ३ किलो गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या कारवाईत, मार्केट पोलिसांनी जिजामाता सर्कल आणि जुन्या भाजी मार्केट परिसरात दोन वेगवेगळ्या कारवर धाड टाकली. कारमध्ये ड्रॅगन चाकू आणि जंबे (कुकरी) सारखी घातक शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कृत्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सर्वेश कांग्राळकर (२६) आणि प्रेम चौगुले (३१) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या दोन्ही कार जप्त करण्यात आल्या आहेत.


Recent Comments