Belagavi

बेळगावमध्ये रेल्वेखाली चिरडून एकाचा मृत्यू

Share

बेळगाव येथील फर्स्ट गेट रेल्वे रुळाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. रेल्वेखाली चिरडून सुमारे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सध्या रेल्वे पोलीस आणि टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

बेळगाव शहरातील फर्स्ट गेट रेल्वे रुळाजवळ आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वेखाली सापडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असावे, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधिकारी तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या मृत व्यक्ती कोण आहे आणि कुठली राहणारी आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसून पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याच्या कामात गुंतले आहेत.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, ही घटना आत्महत्या आहे की धावत्या रेल्वेतून अचानक पाय घसरून पडल्यामुळे झालेली दुर्घटना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तीव्र तपास सुरू केला आहे.

Tags: