कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्वबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बेंगळुरू येथे माध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोशल मीडियावरील अफवा फेटाळत सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनाखाली अहिंदा चळवळ पुढे नेण्याचा आणि पक्षात संयम बाळगण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या आणि आपल्यातील संबंध नेहमीसारखेच मजबूत असल्याचे सांगितले. काही आयटी सेल्स आमच्यात विनाकारण संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर खोटा प्रचार करत असून या चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समाजाच्या म्हणजेच अहिंदा चळवळीचा झेंडा सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपणच पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद किंवा इतर मोठ्या जबाबदाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी आपल्याला कोणत्याही पदाची घाई नसल्याचे सांगितले. काँग्रेससारख्या पक्षात संयम राखणे महत्त्वाचे असते आणि योग्य वेळ आल्यावर सर्वांना संधी मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या मंत्रिपदावर आपण समाधानी असल्याचे सांगत त्यांनी पक्षासाठी वाट पाहण्याची तयारी दर्शवली.
यावेळी त्यांनी २००४ मधील धर्मसिंग सरकारच्या काळातील आठवण सांगताना क्रीडा खात्याबद्दलची आपली जुनी ओढ बोलून दाखवली. सध्याच्या सरकारमध्ये क्रीडा खाते मिळाले असते तर ग्रामीण भागातील खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी क्रांती केली असती असे ते म्हणाले.


Recent Comments