Belagavi

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता

Share

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी बेळगावमधील कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. पाश्चात्त्य आणि तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत असून, केवळ पारंपरिक पोशाखातील भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.

मंदिर प्रशासनाने या संदर्भातील फलक मुख्य प्रवेशद्वारावर लावले आहेत. या नियमांनुसार पुरुषांना हाफ पॅंट, तर महिलांना गाऊन किंवा तोकडे फॅन्सी कपडे घालून येता येणार नाही. महिलांसाठी साडी व्यतिरिक्त इतर कोणताही पोशाख असल्यास दुपट्टा अनिवार्य करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फलकावर या सूचना स्पष्टपणे मांडण्यात आल्या आहेत.

या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, तर प्रत्येक सोमवारी ही संख्या अधिक असते. महाशिवरात्री आणि इतर विशेष सणांच्या दिवशी लाखो भाविक कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, काही भाविक पाश्चात्त्य कपडे घालून येत असल्याने इतरांसाठी अवघड परिस्थिती निर्माण होत होती. ही बाब गांभीर्याने घेत मंदिर समितीने १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही वस्त्रसंहिता लागू केली आहे.

गोवा किंवा इतर पर्यटन स्थळांवरून परतणारे काही पर्यटक आपल्या गावी जाण्यापूर्वी हाफ पॅंट घालूनच मंदिरात प्रवेश करत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, आसपासच्या परिसरातील काही महिला सकाळी स्नान केल्यावर गाऊन घालूनच देवाच्या दर्शनासाठी येत असत, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मंदिरात येणारे भाविक आपल्या सोयीनुसार कपडे घालून येत होते. तसेच मंदिर परिसरातील शिवाच्या मूर्तीसमोर पाश्चात्त्य कपडे परिधान करून रील्स बनवणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली होती. या सर्व प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया मंदिराचे मुख्य पुजारी नागराज कट्टी यांनी दिली.

Tags: