Chikkodi

चिक्कोडीत विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी शिक्षकाला मारहाण

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उर्दू सरकारी हायस्कूलमध्ये १० वीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पालकांनी एका शिक्षकाला शाळेच्या आवारातच मारहाण केली आहे.

या उर्दू सरकारी हायस्कूलमध्ये कन्नड विषय शिकवणारे शिक्षक श्रीशैल कुंभार यांच्यावर हे आरोप झाले आहेत. आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना कन्नड विषयात पास करण्याचे आमिष दाखवून शाळेच्या खोलीत आणि स्वच्छतागृहात नेऊन त्यांचा लैंगिक छळ करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

पाचपेक्षा अधिक विद्यार्थिनींना अशा प्रकारे त्रास दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेत येऊन शिक्षक श्रीशैल कुंभार याला जाब विचारत मारहाण केली. या घटनेमुळे काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी शिक्षक श्रीशैल कुंभार याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Tags: