विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, १० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, भरधाव टिपरचा अचानक टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात टिपर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी आणि सरकारी बसचे चालक हनुमंत छलवादी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, KA-28 AA-6792 या क्रमांकाचा टिपर चडचणच्या दिशेने जात होता. त्याचवेळी चडचणहून विजापूरकडे येणाऱ्या KA-28 F-2468 क्रमांकाच्या सरकारी बसची आणि या टिपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या अपघातात बसमधील सुमारे १० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएसआय सोमेश गेज्जी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Recent Comments