Uncategorized

आरएसएसने उडवाउडवीची उत्तरे न देता अधिकृत कागदपत्रे सादर करावीत

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीस बजावल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघ परिवाराकडून होणाऱ्या टीकेला कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “माझे तोंड बंद करायचे असेल, तर उडवाउडवीची उत्तरे देणे थांबवा आणि अधिकृत कागदपत्रे सादर करा,” असे खडे बोल त्यांनी सुनावले.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रियांक खर्गे म्हणाले, “इतर संघटनांना जे नियम लागू होतात, तेच नियम तुम्हालाही लागू आहेत. आम्ही किंवा राहुल गांधी परदेशात गेलो, की पैशांचा हिशोब विचारता. मग आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमांना कोण स्पॉन्सर करते, हे जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला नाही का? आम्ही राज्यासाठी गुंतवणूक आणायला परदेशात जाताना सरकार परवानगी देत नाही, मग हे लोक कोणत्या अधिकाराने जातात आणि यांच्या काय हालचाली सुरू असतात?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, सरकार कोणत्याही धर्माची नोंदणी मागत नसून संघटनेची नोंदणी मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपला हल्लाबोल सुरूच ठेवत खर्गे म्हणाले की, हा प्रश्न मी वैयक्तिक विचारलेला नसून सरकारने विचारला आहे. “तुमच्या कार्यकर्त्यांमार्फत रस्त्यावर आरडाओरडा करण्याऐवजी तुमच्या कायदेशीर सल्लागारांमार्फत अधिकृत उत्तर द्या. आरएसएसच्या पथसंचलनाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना जनतेच्या करातून पगार दिला जातो. त्यामुळे तुमच्या भाडोत्री माणसांना सोडून ओरडणे बंद करा आणि आम्ही विचारलेल्या ७ प्रश्नांची थेट कागदपत्रांसह उत्तरे द्या,” असे थेट आव्हान खर्गे यांनी दिले.

Tags: