Belagavi

समस्यांच्या गर्तेत बेळगावची बाजारपेठ…ग्राहकांअभावी बाजारपेठ ओस…!

Share

बेळगाव शहरातील अत्यंत गजबजलेली बाजारपेठ असलेल्या भोई गल्ली, भातकांडे गल्ली आणि भेंडीबाजार परिसरात महापालिकेने हाती घेतलेल्या अवैज्ञानिक रस्ते विकास कामांमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी गेल्या दोन महिन्यांपासून नरकयातना भोगत आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे कामे अर्धवट अवस्थेत रखडली असून, संतापलेल्या जनतेचा संयम आता सुटत चालला आहे.

प्रशासनाने कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध न करता भोई गल्ली, भातकांडे गल्ली आणि भेंडीबाजारला जोडणारे तीनही प्रमुख रस्ते एकाच वेळी खोदून ठेवले आहेत. किमान एक रस्ता आधी पूर्ण करून मग दुसरा रस्ता हाती घेण्याची साधी व्यवहार्य बुद्धीही अधिकाऱ्यांनी दाखवलेली नाही. रस्ते पूर्णपणे उखडल्यामुळे एखाद्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तीसाठी तातडीने रुग्णवाहिका बोलावणेही अशक्य झाले आहे. त्यातच खोदलेली माती आणि कचरा रस्त्यावरच टाकून दिल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हा परिसर शहराच्या मुख्य बाजारपेठेचा भाग असल्याने येथे रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, चारही बाजूंचे रस्ते बंद असल्याने गेल्या ८ दिवसांपासून ग्राहक या भागात फिरकणेही बंद झाले आहे. दुकानांसमोरच खड्डे आणि मातीचे ढीग असल्याने व्यापार संपूर्णपणे ठप्प झाला असून, स्थानिक छोटे-मोठे व्यापारी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कामाची पाहणी केली असता, कंत्राटदाराकडून अत्यंत संथ गतीने (आमेगतीने) काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्यास हा संपूर्ण परिसर चिखलमय होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि संबंधित विभागाने तातडीने कामगारांची संख्या वाढवून युद्धपातळीवर हे रस्ते पूर्ण करावेत, अशी तीव्र मागणी आता स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांमधून केली जात आहे.

Tags: