Belagavi

‘बेळगाव वन’ केंद्रात नूतनीकरणाचा खेळखंडोबा

Share

बेळगाव शहरातील रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिका इमारतीमधील ‘बेळगाव वन’ केंद्र सध्या सर्वसामान्यांसाठी समस्यांचे माहेरघर बनले आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिशय संथ गतीच्या नूतनीकरणामुळे दररोज कामासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या केंद्रात वीज बिल भरणे, आधार कार्ड अपडेट करणे यांसारख्या विविध सरकारी सेवांसाठी दररोज शेकडो लोक येतात. मात्र, नूतनीकरणाच्या नावाखाली संपूर्ण कार्यालयात बांधकाम साहित्य आणि कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. यामुळे दूरवरून येणारे नागरिक, वृद्ध आणि लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या महिलांना बसण्यासाठी साधी आसनव्यवस्थाही उरलेली नाही. नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहूनच आपली कामे करून घ्यावी लागत आहेत.

या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवसभर ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांसाठी येथे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन हे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

Tags: