Belagavi

बेळगावमध्ये सीसीबी पोलिसांची कारवाई; गांजा तस्कराला अटक

Share

बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीविरोधात सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोकाक-बेळगाव रस्त्यावर टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांच्या गांजासह एका तस्कराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हुक्केरी तालुक्यातील यल्लापूर येथील मृत्यूंजय भीमसेप्पा जडगी हा कुंदरगी येथील रवी एलिबळ्ळी याच्याकडून गांजा घेऊन तो विकण्यासाठी वाहतूक करत होता. याविषयीची खात्रीशीर माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने करीकट्टी क्रॉसजवळ छापा टाकून संशयित आरोपीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दीड लाख रुपये किमतीचा ३ किलो गांजा, एक बजाज प्लॅटिना दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात मारीहाळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीबी पोलिसांच्या या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Tags: