Belagavi

२ कोटींच्या विम्यासाठी माजी सैनिकाची हत्या? प्रियकराचा व्हिडिओ व्हायरल

Share

२ कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी माजी सैनिकाची हत्या केल्याच्या आरोपावरून हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता मृत सैनिकाच्या पत्नीच्या प्रियकरानेच एक सेल्फी व्हिडिओ जारी करून धक्कादायक खुलासे केले आहेत.

मृत माजी सैनिक संदीप मांजरी यांच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, प्रियकर पुंडलिक डोंबर याने व्हिडिओत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पुंडलिकने सांगितले की, संदीपच्या निवृत्तीनंतर त्याचा चहाचा व्यवसाय सांभाळताना त्याची पत्नी सुमा हिच्याशी माझे प्रेमसंबंध निर्माण झाले. सुमा घरात झोपेच्या गोळ्या आणि दारू आणून ठेवायची आणि संदीपला पाजायची. हुक्केरी यात्रेवरून परतताना संदीपचा अपघात झाला आणि तो रुग्णालयात दाखल झाला. तेव्हा सुमाने मला शेतातील कीटकनाशक औषध आणायला लावले. ते औषध दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी संदीपचा मृत्यू झाला.

सुमाने संदीपच्या नावावर २ कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. विम्याचे पैसे मिळाल्यानंतर दोन्ही मुलांसह बेळगावला जाऊन राहू, असे तिचे नियोजन होते. या माजी सैनिकाच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी आणि विम्याची रक्कम रोखली जावी, अशी मागणी पुंडलिकने केली आहे. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कालच मृत संदीप यांचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन केले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: