बेळगाव महापालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा प्रशासनाला वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्तांनी मागवलेला अहवाल त्वरित सादर करावा, या मागणीसाठी शुक्रवारी महापालिका कार्यालयात जात निवेदनाद्वारे दबाव आणण्यात आला.

बेळगाव महापालिकेत वादग्रस्त ठराव मंजूर करून घेण्यासाठी गेल्या २६ मार्चपासून कन्नड संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडून एक अहवाल मागवला आहे. हीच संधी साधून गडिनाडू कन्नडिगरा सेनेचे बलराम मासेशेट्टी आणि कर्नाटक रक्षण वेदिकेचे (शिवरामेगौडा गट) वाजिद हिरेकोडी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी महापालिका कार्यालयात धुडघूस घातला. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांना निवेदन देऊन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गेल्या तीन महिन्यांत घडलेल्या घडामोडींचा अहवाल विभागीय आयुक्तांना तातडीने पाठवावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. या निवेदनात मार्च महिन्यापासून झालेल्या आंदोलनांचा संदर्भ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २००५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र एकीकरण समिती बहुमतात असलेल्या महापालिकेने मंजूर केलेल्या महाराष्ट्र समर्थक ठरावाचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला असून, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ मोहन कातरकी यांच्या कायदेशीर मताचा आधार घेत प्रशासनाने कर्नाटकच्या बाजूनेच अहवाल द्यावा, अशी मागणी करत प्रशासनावर पुन्हा दबाव आणून वेठीला धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


Recent Comments