Belagavi

विमा रकमेसाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने रचला कट

Share

बेळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले असून पत्नीनेच प्रीयकराच्या मदतीने पतीची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हुक्केरी तालुक्यातील गोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर घटप्रभा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, अनैतिक संबंध लपवण्यासाठी आणि दोन कोटींच्या विमा रकमेसाठी पत्नी सुमा हिने प्रीयकर पुंडलिकच्या मदतीने सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून संदीप यांची क्रूरपणे हत्या केली व अपघाती मृत्यूचा बनाव रचला, असे समोर आले आहे.

संशयावरून पोलिसांच्या तपास पथकाने बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांच्या उपस्थितीत संदीप यांचा तीन महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले असून अहवालानंतर हत्येचे कारण पूर्णपणे स्पष्ट होईल, असे श्रवणकुमार नायक यांनी म्हटले.

सुरुवातीला हा अपघाती मृत्यू वाटला होता, परंतु पोलिसांनी अचूक तपास करून सत्य बाहेर आणले आहे, अशी प्रतिक्रिया मृत संदीप यांचे बंधू संजय मंजरगी यांनी दिली. तसेच देश कल्पिणाऱ्या सैनिकाचा विश्वासघात करून हत्या करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संजय मंजरगी यांनी केली आहे.

Tags: