बेळगावमध्ये बेकायदेशीर जुगार आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने केएसआरपी दुसऱ्या बटालियनजवळ सार्वजनिक ठिकाणी ओसी जुगार खेळवणाऱ्या नवीन हनुमंत कडकौळ याला रोकड आणि जुगाराच्या साहित्यासह अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भांदूर गल्ली परिसरात संशयास्पद रितीने वावरणाऱ्या समर्थ भगवंत नवली या तरुणाला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्या पथकाने फाटण शोरूमजवळ अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या शंकर मारुती गोल्लर आणि सदाशिव गौरेश पुजारी या दोघांना वैद्यकीय तपासणीच्या आधारे अटक केली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


Recent Comments