बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय कामांसाठी मुख्य केंद्र असले तरी, येथे येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात रॅम्प, व्हीलचेअर आणि लिफ्टच्या वापरासाठी योग्य मार्गदर्शनाची कमतरता असल्याचे दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे.

कार्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी केवळ पायऱ्यांचा वापर असल्याने, व्हीलचेअरवरून येणाऱ्या दिव्यांगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयापर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. डिजिटल सेवा आणि नवनवीन बांधकामांना प्राधान्य देणारे प्रशासन, दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सोयींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शासकीय कार्यालये दिव्यांगस्नेही असावीत असा नियम असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगांनी खंत व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची ही अवस्था असेल तर तालुका स्तरावरील कार्यालयांची स्थिती काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गांधी नगर येथील रहिवासी इब्राहिम शेख यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी बंद पडलेली पेन्शन सुरू करून चांगले काम केले आहे, आता प्रशासनाने कार्यालयात रॅम्प, विशेष मदत केंद्र आणि व्हीलचेअरसारख्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात.” तसेच, आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी भर दिला आहे.


Recent Comments