Belagavi

बेळगावात जैनमुनी श्री विजय नित्यानंद सुरीश्वरजी महाराजांचा मंगल प्रवेश

Share

बेळगावमधील सदाशिवनगर येथील जैन मंदिरात आज भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जैन धर्माचे सुप्रसिद्ध शांततादूत आणि पद्मश्री पुरस्कार विजेते परमपूज्य आचार्य भगवंत श्रीमद्विजय नित्यानंद सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी तब्बल १५ ते १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज बेळगावच्या पुण्यभूमीत मंगल प्रवेश केला.

श्रमण भगवान महावीर स्वामींच्या परंपरेचे सद्याचे गच्छाधिपती असलेल्या पूज्य गुरुदेवांचे सदाशिवनगर जैन मंदिरात स्थानिक श्रावक आणि मान्यवरांनी अत्यंत श्रद्धेने व भावपूर्ण स्वागत केले. देशभरात पायी पदयात्रा करून ‘जगा आणि जगू द्या’ हा अंहिसेचा संदेश तसेच व्यसनमुक्त समाजाची हाक देणाऱ्या जैनमुनींनी या वेळी उपस्थितांना आशीर्वाद दिले. जात, धर्म, पंथ यांमधील भेद विसरून आपण सर्व जण भारतमातेची लेकरे आहोत, याच राष्ट्रप्रेमाच्या भावनेने आणि परस्परांवरील प्रेमाने सर्वांनी एकत्र राहावे, हाच आपला मुख्य संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण भारतात २ लाख किलोमीटरपेक्षा अधिक पदयात्रा करणाऱ्या पूज्य महाराज साहेबांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक आणि मानवतावादी कार्यासाठी भारत सरकारतर्फे २०२५ मध्ये प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेतून देशात विविध ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात आली असून बिहारमधील लछुवाड येथे ४० हजारांपेक्षा जास्त मोफत मायक्रो सर्जरी करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातही मोठे कार्य करत त्यांनी २० हून अधिक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत, ज्यामध्ये मूक-बधिर मुलांची विशेष शाळा आणि शेकडो गरीब मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या राजस्थानमधील १५१ इंचाच्या प्रसिद्ध ‘स्टॅच्यू ऑफ पीस’च्या उभारणीमागे आचार्य श्रींचीच मुख्य प्रेरणा होती. त्यांनी ५०० हून अधिक जैन मंदिरांच्या अंजनशलाका प्रतिष्ठापनेचे मार्गदर्शन केले आहे. पक्षांचे रुग्णालय आणि गोशाळांच्या माध्यमातून जीवदयेचे कार्य करणाऱ्या आचार्यांनी ३० हून अधिक आध्यात्मिक ग्रंथांची रचना केली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याविषयी मोक्षानंदजी महाराज यांनी इन् न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली.

या ऐतिहासिक मंगल प्रवेश सोहळ्याप्रसंगी जैन ट्रस्ट मंडळाचे उत्तम पोरवाल, राजू खोडा, महेश पोरवाल, राजू धुमावत यांच्यासह समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते. या सर्वांनी जैनमुनींचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

Tags: