बेळगाव तालुक्यातील बसवन कुडची येथील चिन्नाम्मा बसवंतय्या हिरेमठ वृद्धाश्रमात नागनूर श्री बसवेश्वर ट्रस्टच्या सहकार्याने, क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक एम. एस. चौगला यांनी रोपट्याला पाणी देऊन केले. या वेळी बोलताना त्यांनी दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आनंद झाला असून, अशा सामाजिक संस्थांच्या मदतीमुळेच वृद्धाश्रमांना खरा आधार मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. तसेच त्यांना बेडशीट्स, रोजच्या लागणाऱ्या किराणा वस्तू आणि नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही संस्थांना भरभरून आशीर्वाद दिले.

दूरदर्शन व आकाशवाणीचे कलाकार आणि बेळगाव महिला कल्याण संस्थेचे समन्वयक डॉ. श्रीरंग जोशी यांनी या वेळी निसर्गावर आधारित एक सुंदर गीत सादर केले. कार्यक्रमात एम. एस. चौगला आणि डॉ. श्रीरंग जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षा मंगला मठद यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सचिव भारती रत्नप्पागोळ यांनी प्रास्ताविक केले. ममता अँटीन, शोभा काडण्णावर, मैना कुलकर्णी व रत्नगुडागनट्टी यांनी प्रार्थना सादर केली. सुशीला गुरव, नमिता सोंटक्की, लीला शेरी व मंदाकिनी निरलेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नमिता सोंटक्की यांनी आभार मानले.



Recent Comments