Belagavi

बेळगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालवणे पालकांना पडले महाग

Share

बेळगावमध्ये अल्पवयीन मुलाने बेकायदेशीरपणे कार चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिराजवळ एका अल्पवयीन मुलाला केए-२६-एम-३४०९ क्रमांकाची कार चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडले. पोलिसांनी कारसह त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा असल्याची समज पोलिसांनी पालकांना दिली. याप्रकरणी मोटार वाहन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असून वाहन मालकाला आता न्यायालयात २५,००० रुपये दंड भरावा लागणार आहे.

त्यामुळे बेळगावमधील पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देऊ नयेत. वाहतूक नियमांचे पालन करून रस्त्यावरील नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून नागरिकांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

Tags: