बेळगावमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला असतानाच, शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये विजेच्या खांबांचे बॉक्स उघडे असल्याने नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.


स्मार्ट सिटी बेळगावमधील गोगटे सर्कल, रेल्वे स्टेशन रोड, पोस्टमन सर्कल आणि फोर्ट डबल रोड यांसारख्या गजबजलेल्या भागातील पथदिव्यांच्या विद्युत बॉक्सची झाकणे तुटली आहेत. यामुळे आतील थेट विद्युत तारा आणि स्विच उघड्यावर आले असून, पावसाचे पाणी पडल्यास संपूर्ण खांबामध्ये वीज उतरण्याची भीती व्यक्त होत आहे.

या मार्गांवरून दररोज हजारो शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचारी ये-जा करतात. उघड्या तारांमुळे शॉर्ट सर्किट झाल्यास संपूर्ण परिसरातील पथदिवे बंद पडून रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता वाढू शकते, तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर, हेस्कॉम आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तोपर्यंत किमान तात्पुरती सुरक्षा कवच आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला यासंबंधी निवेदन दिले असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Recent Comments