बेळगावमधील ‘शिवम असोसिएट्स’ कोट्यवधी रुपयांच्या ठेव फसवणूक प्रकरणाची चौकशी आता कन्नड चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचली आहे. फसवणुकीच्या पैशातून आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या आरोपावरून सिआयडी अधिकारी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नटांना नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत.

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या शिवम असोसिएट्सचा मालक शिवानंद नीलण्णावर याने नागरिकांकडून गोळा केलेले कोट्यवधी रुपये या चित्रपट कलाकारांच्या कार्यक्रमासाठी वापरल्याचा संशय चौकशीत व्यक्त झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये बेळगावमध्ये झालेल्या एका भव्य महोत्सवासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता, जो आता सिआयडीच्या तपासाचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्टार कलाकारांना मानधन आणि इतर खर्चासाठी गुंतवणूकदारांचाच पैसा देण्यात आला होता का, याची माहिती घेण्यासाठी सिआयडी नोटीस जारी करत आहे.

अधिक परतावा आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून शिवम असोसिएट्सने विविध जिल्ह्यांतील आणि राज्यातील हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून फसवणूक केली होती. या प्रकरणाचा तपास तीव्र करत सिआयडी अधिकाऱ्यांनी आता चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची चौकशी करण्याची तयारी केली आहे. कलाकारांनी चौकशीला हजेरी लावल्यानंतर या कोट्यवधींच्या फसवणूक गैरव्यवहाराचे धागेदोरे चित्रपटसृष्टीत कुठपर्यंत पसरले आहेत आणि कोणाला किती रक्कम मिळाली, याची अधिक माहिती समोर याची शक्यता आहे.


Recent Comments