बेळगावमधील भाग्यनगर भागात असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयाजवळ आज तीव्र तणाव निर्माण झाला. हजारो कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या कार्यालयाजवळ गोंधळ उडाला.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच बातमीचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी केल्याचा आरोप होत आहे. कार्यालयातील महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तसेच काही लोकांनी जमाव जमवून माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.

या गोंधळादरम्यान काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही माध्यम प्रतिनिधींशी हुज्जत घालत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कंपनीचा मालक बलराज माने याच्या समर्थनार्थ कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली असून, आमच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करत गोंधळ घालणाऱ्यांना बाजूला केले आणि परिसरातील तणाव शांत करून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.


Recent Comments