बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या शासकीय निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी (BEO) घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांच्या मागणीनुसार पर्यायी जागेत कन्नड शाळा चालवण्यास संमती दिली आहे.

सावगावमधील मराठी शाळेत कन्नड माध्यमाचे वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावामुळे मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बेळगावच्या बीइओ दानम्मा जाळकी यांनी थेट सावगाव शाळेला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. कन्नड शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करेपर्यंत एक महिन्याचा वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी केली. यावर शाळा सुधारणा समिती आणि गावकऱ्यांनी जुन्या शाळा इमारतीची स्वच्छता करून ती वापरण्याचा सल्ला दिला, तसेच दुरुस्ती होईपर्यंत स्वतःच्या खर्चाने भाड्याची खोली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळेत कन्नड माध्यम सुरू करू नये या गावकऱ्यांच्या मागणीला बीइओ यांनी मान्यता दिली असून पर्यायी जागेत कन्नड शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सागावकर, इसिओ बडिगेर, क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक एल. एस. चांदीलकर आणि सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.


Recent Comments