Belagavi

बेळगाव मधील खाजगी शाळेत पालकांना फी वाढीचा धक्का

Share

बेळगावमधील एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेच्या नव्या प्राचार्यांनी शाळा सुरू होताच संपूर्ण फी भरण्याचा जाचक नियम केला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांसाठीही पालकांकडून बेकायदेशीरपणे मोठी रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

या मनमानी कारभाराचा निषेध करत आज पालकांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि शाळेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

प्रवेशाच्या वेळी फी वाढ न करण्याचे आश्वासन देऊनही आता दर दोन वर्षांनी मनमानी फी वाढवली जात आहे. शाळा सुरू होऊन चार दिवस झाले नसताना, संपूर्ण फी न भरल्यास पुस्तके न देण्याचा तगादा प्राचार्यांनी लावला आहे. मोफत सरकारी पुस्तकांसाठी पैसे उकळले जात असून, वही-साहित्यही शाळेतूनच दुप्पट किमतीत घेण्याची सक्ती केली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

फी न भरल्यास विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असून, शाळा सोडल्याचा दाखला (TC) घेऊन जाण्याची धमकी दिली जात आहे. तसेच, अवजड पुस्तकांमुळे मुलांना दप्तर वाहणे कठीण झाले आहे. योग्य पगार न मिळाल्याने अनुभवी शिक्षकांनीही शाळा सोडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

या वेळी खाजगी इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: