बेळगावमधील टिळकवाडी भागात असलेल्या ‘आदित्यराज कॅपिटलं प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपानंतर, शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कसून चौकशी आणि धाडसत्र सुरू आहे.

बेळगावचे सहायक आयुक्त (AC) श्रावणकुमार नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता. आज दुसऱ्या दिवशीही महसूल विभाग, सहकार विभाग आणि सायबर क्राईम पोलिसांचे संयुक्त पथक कंपनीच्या कागदपत्रांची आणि बँक खात्यांची कसून तपासणी करत आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बलराज माने (मूळ रा. महाराष्ट्र) हा अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कंपनीच्या देशभर एकूण ९ शाखा असून बेळगाव, बेंगळुरू, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये या कंपनीचे जाळे पसरल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सुमारे ५ हजार गुंतवणूकदारांची माहिती गोळा केली आहे. मात्र, कंपनीचे काही कर्मचारी गुंतवणूकदार आणि बँक खात्यांची पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकासह (मॅनेजर) अनेक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली असून, सर्व आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड जप्त केले आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीच्या कार्यालयाभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments