ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

एच. के. पाटील यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्यामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये निराशा पसरल्याचे क्रिया समितीने म्हटले आहे. यापूर्वी सीमाभाग प्रभारी मंत्री म्हणून काम करताना पाटील यांनी येथील समस्यांचा सखोल अभ्यास केला होता. बेळगावमधील कन्नड शाळांसाठी मंजुरी मिळवून देणे आणि येथील राज्योत्सव कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी आठवण समितीने करून दिली आहे.

एच. के. पाटील यांचे वडील दिवंगत के. एच. पाटील यांनीही १९७३ मध्ये देवराज अर्स यांच्या मंत्रिमंडळात सीमाभाग प्रभारी मंत्री म्हणून काम केले होते. अशा ज्येष्ठ नेत्याच्या पुत्राला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे योग्य नाही, असे मत समितीने व्यक्त केले आहे. सीमाभागातील हितसंबंध जपण्यासाठी आणि राजकीय समतोल राखण्यासाठी हायकामांड आणि मुख्यमंत्र्यांनी आगामी विस्तारात एच. के. पाटील यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, अशी मागणी कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखालील क्रिया समितीने केली आहे. या वेळी महादेव तलवार, बळराम माशेनट्टी आणि अशोक चंदरगी उपस्थित होते.


Recent Comments