विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात झालेल्या ६ जणांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अधिक तीव्र केला आहे. या प्रकरणात यापूर्वी ११ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर आज मुख्य आरोपी अप्पूगौडा पाटील याच्यासह आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जमीन विवादातून २९ मे रोजी गोविंदपूर गावात ६ जणांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत चंद्रकांत निराळे, त्यांची मुले समर्थ व राहुल, तसेच दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे आणि शब्बीर अत्तार यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी १ जून रोजी मुख्य आरोपी कल्लणगौडा पाटील याच्यासह ११ आरोपींना अटक केली होती. पुढील तपासादरम्यान इतर काहींचा सहभाग समोर आल्यानंतर आज अप्पूगौडा पाटील याच्यासह सहा जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १७ झाली आहे.
या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली असून चडचण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments