बेळगावमध्ये कित्तूर कर्नाटक अल्पसंख्याक मुस्लिम जमात महासंघाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी महासंघाच्या नेत्यांनी या वेळी केली.

उत्तर कर्नाटकातील १८ जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात निवडून आलेले आसिफ सेठ हे एकमेव मुस्लिम आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणे आवश्यक असल्याचे मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. गेल्या वीस वर्षांपासून उत्तर कर्नाटकातील मुस्लिम नेत्यांना मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. या वेळीही आसिफ सेठ यांना मंत्रिपद न दिल्यास संपूर्ण उत्तर कर्नाटकातील अल्पसंख्याक समाजावर मोठा अन्याय होईल, अशी चिंता महासंघाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

नवीन मंत्रिमंडळ रचना आणि विस्ताराच्या वेळी उत्तर कर्नाटकाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी महासंघाची प्रमुख मागणी आहे. या संदर्भात आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्याबाबत हायकमांड आणि राज्य सरकारला निवेदन देण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडे एक मोठे शिष्टमंडळ नेण्यात येईल, असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मुदळगीचे लालसाब सिद्धापूर, बैलहोंगलचे ॲड. मौलासाब मदनगी, रायबाग कुडचीचे इरफान तरडे आणि लोंढा येथील सलीम पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments