हुबळीमधील तबीब लँड येथे असलेल्या हेस्कॉम कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. कृषी पंपांना अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पिके वाळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हेस्कॉम प्रशासनाचा निषेध केला.


सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी हुबळीमधील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घातला. यावेळी बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसहहजर झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेस्कॉमच्या कारभाराचा निषेध केला.


शेतीसाठी योग्य वेळी आणि पुरेसा वीजपुरवठा केला जात नाही. त्यामुळे डोळ्यांदेखत पिके वाळत आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून घेतलेली पिके वाया जात असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हेस्कॉम अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असून, अधिकारी आणि सरकारला वारंवार विनंती करूनही काहीही फायदा झाला नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला हजेरी लावली होती.


Recent Comments