Belagavi

बेळगावमध्ये हिजाब निर्णयाविरोधात श्रीराम सेनेचे आंदोलन

Share

राज्य सरकारने शाळा-कॉलेजांमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात श्रीराम सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


शाळा आणि कॉलेजांमध्ये हिजाबला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बेळगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखाली राणी चन्नम्मा चौकात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. शाळा-कॉलेजांमध्ये शैक्षणिक वातावरण टिकून राहावे आणि सर्वांना समान नियम असावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

शाळा-कॉलेजांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याच्या शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांच्या निर्णयाचा निषेध करत असून याला विरोध म्हणून श्रीराम सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना भगव्या शाली वाटप करण्यात येणार असल्याचे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांनी म्हटले. शाळा-कॉलेजांमध्ये सर्व विद्यार्थी समान असून गणवेश हीच शिस्त असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली.

हिजाबवर बंदी न घातल्यास प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भगवे ध्वज आणि भगव्या शाली वाटप करण्याचा इशारा देत कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा चौकातून कॉलेजच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सतर्कता दाखवत श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांच्यासह २० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Tags: