Belagavi

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे

Share

बेळगावमधील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि महापालिकेच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे उपनेते अरुणभाई दुधवडकर यांनी बेळगावला अचानक भेट देऊन सीमाभागातील आंदोलकांना आपला पाठिंबा दर्शवला.

शिवसेना उपनेते, कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख तथा ‘बेस्ट’चे माजी अध्यक्ष अरुणभाई दुधवडकर यांनी बेळगावमधील युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी मार्ग बदलून बेळगावला भेट दिली. या वेळी बेळगावमध्ये स्थानिक प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय आणि बेळगाव महापालिकेकडून सुरू असलेल्या असंवैधानिक कारभाराची माहिती त्यांना देण्यात आली. सीमाभागातील जनतेची ही व्यथा आणि महत्त्वाचा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन अरुणभाई दुधवडकर यांनी दिले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सीमाभागातील जनतेच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहेत आणि यापुढेही राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Tags: