Belagavi

बेळगावमध्ये कार अडवून कोट्यवधींचा दरोडा

Share

गोवा येथे जाणाऱ्या सुवर्ण कारागिरांचे अपहरण करून, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४०.५० लाख रुपयांची रोकड, वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक के. रामराजन बोलत होते. पश्चिम बंगाल मूळचे आणि सध्या बेळगावमधील शहापूर येथे राहणारे एस. के. इबादुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इबादुल हे त्यांचे मित्र रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासोबत कारने गोव्याला चालले होते. दरम्यान, खानापूर तालुक्यातील उचवडे गावातील बैलूर क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग ७४८ वर काही जणांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर तिघांनाही रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात नेऊन पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून धमकावण्यात आले. इबादुल यांच्याकडील १,००,२०० रुपयांची रोकड आणि रबीयतल गाझी यांच्याकडील २२५ ग्रॅम सोने लुटून दरोडेखोर पसार झाले होते.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तक्रारदाराचे मित्र रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांनीच या दरोड्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी शहापूरमधील सादीक तोरगल याच्याशी संगनमत करून विवेक चंद्रकांत पाटील याला ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

सुपारी घेतलेल्या विवेक पाटील याने आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रबीयतल रुहुल अमीन गाझी, अली हुसेन कविरुद्दीन मंडल, सादीक अब्दुल रहमान तोरगल, विवेक चंद्रकांत पाटील, प्रशांत महादेव चव्हाण, नितीन राजाराम चव्हाण, दिगंबर नागेश पाटील आणि मयूर राजू घाडी यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी बेळगावमधील विविध भागांतील रहिवासी आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सुझुकी ब्रेझा, एर्टिगा आणि आणखी एक कार, १,००,२०० रुपयांची रोकड, कंट्री पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल फोन, एक मोटारसायकल आणि २०५ ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट असा एकूण ४०,५०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

Tags: