Belagavi

आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद देण्याची मागणी

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगाव मध्ये समर्थकांनी आणि नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आमदारांना मंत्रिपद मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा कार्यकर्त्यांनी हाय कमांडला दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आसिफ सेठ यांचे समर्थक मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, बेळगाव शहराला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही. माजी दिवंगत खासदार सिद्नाळ हे अनेक वेळा खासदार झाले, तरीही त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आमदार आसिफ सेठ यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली असून, यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन बेळगाव शहराला प्रतिनिधित्व द्यावे. यासाठी हाय कमांडला पत्र पाठवण्याची मोहीम राबवली जाईल, असे मल्लेश चौगुले यांनी म्हटले.

यासोबतच मंत्री सतीश जारकीहोळी यांना केपीसीसी अध्यक्षपद आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही उच्च पद मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बेळगावमधील अहिंदा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या शहर आमदारांना मंत्रिपद मिळावे हाच आमचा आग्रह आहे. दोन्ही मंत्र्यांनी शहराच्या विकासावर भर दिला असून, बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने येथे आणखी एकाला मंत्रिपद देण्यात यावे, अशी अपेक्षा मल्लेश चौगुले यांनी व्यक्त केली.

सर्व जाती, धर्म आणि भाषिकांना सोबत घेऊन चालणारे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिपद दिल्यास बेळगावचा अधिक विकास होईल. तसेच शहर आमदारांना मंत्रिपद देणे हा बेळगावचा सन्मान ठरेल, अशी मागणी आर. पी. पाटील यांनी केली.

या पत्रकार परिषदेला आमदार आसिफ सेठ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: